Friday, July 1, 2016

लग्न पहावं करून …

लग्न पहावं करून … 
-रश्मी घटवाई 
​​
​​
​​
​​
घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करून अशी आपल्याकडे म्हण असली तरीही त्यातल्या गर्भित आशयाला नं जुमानता मंडळी हिरीरीनं मैदानात उतरतात आणि त्यातही लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं आपण मानत असलो तरी विवाहेच्छुक स्थळांची गाठ पडावी म्हणून आपण मर्त्य मानवांना त्यासाठी प्रयत्न इथे पृथ्वीतलावरच करावे लागतात. कोणे एके काळी मध्यस्थ हे काम मोठ्या आनंदानं करीत. चारचौघांकडे येणे-जाणे असलेल्यांना कुणाची मुलगी उपवर आहे,कुणाचा मुलगा लग्नाचा आहे ,ह्याची माहिती असायची आणि तेही ही माहिती संबंधितांना देण्याचे हे काम समाजकार्य म्हणून मोठ्या आवडीने करायचे.बघता बघता,लग्न जमवणे ह्या हौसेनी करायच्या गोष्टीने व्यवसायाचे रूप कधी धारण केले आणि लग्न नामक कौटुंबिक सोहोळ्याला 
ग्लॅमरस इव्हेंटचे स्वरूप कसे आले ,हा विचार मनात उमटायला सुद्धा वेळ लागावा,एवढ्या प्रचंड गतीनं ह्या साऱ्याचा 'ट्रेण्ड' बदलला .पूर्वी ओळखी-पाळखीतून विवाह ठरायचे,ते जणू आता कालबाह्य झालं.मध्यस्थांची जागा ' 
मॅरेज ब्युरो',वधु-वर सूचक मंडळांनी घेतली. ओळखीच्यांच्या मार्फत कळलेल्या मोजक्या स्थळांऐवजी अपेक्षेत बसणाऱ्या आणि अनुरूप असणाऱ्या  सुयोग्य 
स्थळांची मोठ्ठी यादी केवळ एका क्लिकसरशी पुढ्यात ठेवणाऱ्या संकेत स्थळांवर अधिक भिस्त ठेवल्या जाऊ लागली,वधु-वरांची माहिती प्रकाशित करणारी मासिकं पूर्वीपासून होती,त्यात नवी भर पडली,वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्या शुल्क आकारून 'स्थळांची' माहिती प्रसिद्ध करू लागल्या,त्यांना भरपूर प्रतिसाद लाभू लागला.एवढे सगळे असले;विवाहोत्सुक युवक-युवतींबद्दलच्या माहितीचा ओघ आंतरजालावर कितीही वाहत असला तरीही आजही,आपल्या उपवर मुलींसाठी सुयोग्य मुलेच मिळत नाहीयेत असा मुलींच्या पालकांचा सूर आहे आणि आपल्या मुलाला साजेशा मुलीच मिळत नाहीयेत ही मुलांच्या पालकांची खंत आहे.
 

शिक्षण-नोकरी ह्यानिमित्ताने मुलामुलींची ओळख होऊन प्रेमविवाह होण्याचं प्रमाण वाढलं असलं तरी सगळ्यांचेच काही प्रेमविवाह होत नाहीत. साहजिकच,अगदी पूर्वीसारखे चहा-पोह्याचे जरी नसले,तरी रीतसर बघण्याचे कार्यक्रम होऊन अरेन्ज्ड मॅरेज होण्याचेही प्रमाण खूप आहे. 
मुलगी अथवा मुलगा लग्नायोग्य झाल्यावर ओळखी-पाळखीच्या व्यक्तींच्या कानावर त्यांची माहिती घालणं,त्यांनी स्थळे सुचवणं,हे आता जवळ जवळ कालबाह्य ठरलंय कारण सर्व काही चांगलं  जुळून आलं  तरीही त्याबद्दल कुणी साधे आभार व्यक्त करीत नाहीत पण जर का त्यातून काही वाईट निष्पन्न झालं,तर लोक त्यांच्यावरच ठपका ठेवायला मागेपुढे बघत नाहीत,त्यामुळे लोक स्थळांची माहिती द्यायला कचरतात.एखादी गोष्ट कुणाला आवडेल,तीच दुसऱ्यासाठी नं आवडणारी ठरू शकेल,एखादी व्यक्ती एकाला जशी वाटेल,तशी दुसऱ्याला वाटेलच असे नाही. त्यामुळे ओळखी-पाळखीच्या व्यक्तींकडून माहिती मिळून विवाह ठरणं जवळ जवळ बाद झालंय.त्यामुळे लग्नायोग्य झालेल्या आपल्या मुलाचे अथवा मुलीचे नाव इंटरनेटवर असलेल्या वधु-वर सूचक मंडळात हजारो रुपये देऊन नोंदवणे हा एकमेव पर्याय पालकांपुढे आहे आणि तो काही अंशी सोपा-सुलभ आहे. पण विवाह जमणे म्हणजे केवळ वधु गटाला अपेक्षित असलेल्या गोष्टी वर गटाकडे असणे एवढेच नसते .वधुवर सूचक मंडळाकडे डेटाबेस भलेही खूप मोठा असू शकतो,पण त्या उपलब्ध माहितीस्त्रोतातून लग्न जमेलच याची खात्री कशी देता यावी?परिणामी, "तिथे नाव नोंदवून तीन -तीन महिने उलटून गेलेत,तरी आम्ही आहोत तिथेच आहोत,म्हणजे बघा !"अशी एका पालकांची व्यथा पुरेशी बोलकी ठरते . 

विवाह या विषयावर मी आधीही बरेच लेखन केले आहे.त्या लेखांना वाचकांचा भरपूर प्रतिसाद लाभला होता.आपल्या अवतीभोवती सुरु असलेल्या गोष्टींचा,अनेकांच्या अनुभवांचा इतरांनाही फायदा व्हावा,हा ह्या लेखाचाही उद्देश आहे.सात -आठ वर्षांपूर्वी मी जेव्हा हे लेख लिहिले त्यावेळी कुणीही इंटरनेटवर असलेल्या वधु-वर सूचक मंडळात नाव नोंदवलेल्या वधुवरांची माहिती बघू-वाचू शकत होता.एखादा रिकामटेकडा अथवा आंबट शौकीन  त्या माहितीचा दुरुपयोग करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नव्हती. मी माझ्या लेखांतून त्यावर आवाज उठवला आणि इंटरनेटवर असलेल्या वधु-वर सूचक मंडळांनी त्यानुसार बदल केले.मात्र आजही पालकांची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे अपेक्षेत न बसणाऱ्या,वयाने खूप मोठे अथवा लहान असलेल्या(ही अशी प्रोफाइल्स  मुले स्वत: मॅनेज करीत असतात.)प्रोफाइल्सकडून विवाहाचे प्रस्ताव येतात,ते फोन नंबर घेऊन अकारण संपर्क साधू लागतात.त्यामुळे,कुणीही रिकामटेकडा आपले खोटे प्रोफाईल बनवू शकतो,एखादा आंबट शौकीन काही हजार रुपये भरून आपले खोटे,आकर्षक प्रोफाईल बनवून उपवर मुलींची माहिती मिळवू शकतो,ह्या सगळ्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो,हे ध्यानी घेऊन इंटरनेटवरच्या  
मॅरेज ब्युरो, वधु-वर सूचक मंडळांनी
 आणखी कडक नियम आणि त्यांची काटेकोर अंमल बजावणी केली पाहिजे.

आपल्या अपेक्षेनुरूप असलेल्या,लिखित माहिती आणि फोटोत "यासम हा/ही "भासणारी व्यक्ती प्रत्यक्षात तशी नसते,असाही अनुभव अनेकांना येतो. पालक अनेकदा आपल्या अपत्याचा एखादा गंभीर आजार,सिंड्रोम याबद्दलची माहिती लपवतात,लग्नासाठी अगदी होकार कळवण्याच्या बेतात असतांना ती बाब विरुद्ध पक्षाच्या लक्षात येते आणि त्यांचा अपेक्षाभंग होतो.त्यात दोन्ही पक्षांचा वेळ,पैसा आणि भावना ह्यांची नासाडी होते. 

शिक्षण,नोकरी ह्यानिमित्ताने मुले मुली आपल्या घरांपासून दूर वेगवेगळ्या शहरांत असतात,त्यामुळे मुलगा-मुलगी,दोघांचे आई-वडील अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी एकत्र येउन बघण्याचा कार्यक्रम करायचा किंवा आपापल्या सोयीने भेटी घ्यायच्या,ह्यात हल्ली  भरपूर वेळ लागत असल्याने "चट मंगनी,पट ब्याह "हा केवळ वाक्प्रचार उरला आहे.तसंही लग्न ही काही घिसड-घाईनं करण्याची गोष्ट नाहीये,कारण आयुष्यभराचा प्रश्न आहे!वरवरच्या गोष्टींना भुलून अविवेकानं,अविचारानं घेतलेला निर्णय आयुष्यच बद्लून टाकणारा ठरू शकतो.त्याबद्दल नंतर कितीही पश्चात्ताप केला तरी उपयोग नसतो!आता आजकाल केवळ एकदा भेटून लग्नाचा निर्णय मुलगा-मुलगी घेत नाहीत,किमान दोन-तीन वेळा भेटल्यानंतरच मुलगा-मुलगी आपण एकमेकांना अनुरूप आहोत अथवा नाही हे ठरवतात,मात्र अनेकांना त्यानंतरही निर्णय घेणं कठीण जातं. 

आपण नक्की कसे आहोत, भावी जोडीदारापासून आपल्या काय अपेक्षा आहेत,आपल्या अपेक्षा शंभर टक्के कुणीही पुऱ्या करू शकणार नाही,त्यासाठी काही तडजोडी दोघांनाही कराव्या लागतील ,ह्याची जाण दोघांनाही असली पाहिजे.किंबहुना भावी जोडीदाराशी ज्या गोष्टीत आपण अज्जिबात तडजोड करू शकणार नाही ,आपल्या ज्या तत्वांशी फारकत घेऊ शकणार नाही अशा अजिबात न खपणाऱ्या गोष्टी "रेड झोन "मध्ये ,एकमेकांच्या ज्या गोष्टींकडे आपण कानाडोळा करू शकू,खपवून घेऊ शकू, अशा  गोष्टी "येलो झोन "मध्ये आणि ज्या गोष्टींत,ज्या मुद्द्यांवर संपूर्ण तडजोड शक्य  आहे त्यांना "ग्रीन झोन "मध्ये ठेवावं,अशी विभागणी करून दोघांनीही त्यावर मोकळेपणानं चर्चा केली तर विवाहाबाबत निर्णय घेताना आपण एकमेकांना अनुरूप आहोत अथवा नाहीत ,एकमेकांच्या पत्रिकांमध्ये जुळणाऱ्या गुणांपेक्षाही प्रत्यक्षातले आपले सूर अधिक सुरीले मिळताहेत अथवा नाही,हे ठरवणे सोपे जाईल. 
शेवटी लग्न का करायचं असतं,हे कुणाल चांदेगावकर यांच्या शब्दांत सांगायचं,तर ,

"कुणीतरी असलं पाहिजे…  
कुणीतरी असलं पाहिजे 
संध्याकाळी घरी गेल्यावर 
आपल्यासाठी दार  उघडायला
सकाळी घरातून बाहेर पडताना 
"लवकर ये "असं सांगायला … 
उशीर होत असेल,तर 
"जेवून घ्या "असं सांगायला 
कितीही वेळा सांगितलं तरीही 
आपल्यासाठी जेवायचं थांबायला "

आणि लग्न म्हणजे तरी काय असतं,हे त्यांच्याच शब्दांत सांगायचं,तर ,
"लग्न लग्न म्हणजे तरी काय असतं? 
त्याला लागताच ठसका,तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं 
तिला लागताच ठेच,त्याचं मन कळवळतं ….  
लग्न लग्न म्हणजे तरी काय असतं?
त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरूण असतं 
तिच्या दु:खाला त्याच्या खांद्याचं अंथरूण असतं… "  

My Article was published in Tarun Bharat .Here is the Link:
http://epaper.tarunbharat.net/epaper.aspx?lang=3&spage=Akspage&NB=2016-06-17#Akspage_1                                                          

No comments:

Post a Comment