Friday, July 29, 2016

Matrimony:सगळं ‘वेळच्या वेळी’ झालेलं बरं! रश्मी घटवाई

सगळं ‘वेळच्या वेळी’ झालेलं बरं!


एक काळ असा होता की, पदवी परीक्षा झाल्यावर मुलांनी नोकरीला लागायचं आणि पदवीचं शिक्षण सुरू असताना किंवा पदवी परीक्षेनंतर मुलींसाठी ‘स्थळ’ बघायला लागायची, असा एक शिरस्ता होता. त्या शिरस्त्यानुसार लग्नं, मुलांचे जन्म वगैरे सगळं कसं ‘वेळच्या वेळी’ होऊन गुण्यागोविंदानं संसार केलेल्यांच्या पुढच्या पिढ्या आता विवाहयोग्य वयाच्या झाल्या आहेत. मात्र, आपला मुलगा/मुलगी अथवा नात/नातू विवाह करण्यायोग्य वयाचा/वयाची होऊन ही विवाहोत्सुक नाहीत, लग्नासाठी तयार नाहीत, हे बघून मागच्या पिढीतल्यांना काही उमजेनासं झालंय्. त्यांच्या मनात प्रचंड कालवाकालव होतेय्. ‘सगळं’ वेळच्या वेळी झालेलं बरं! असा धोशा ते त्यांच्या लेखी विवाह योग्य वयाचे झालेल्या मुला-मुलींच्या, नातवंडांच्या मागे लावताहेत आणि मुला-मुलींना, नातवंडांना ते मनावर घेण्यासाठी वेळच नाहीये असं सध्याचं चित्र आहे.
सध्याची पिढी शिक्षण, करीअर ह्यात गुंतली आहे. सध्याचं युग ‘सुपरस्पेशलायझेशन’चं आहे. त्यामुळे नुसत्या पदवीला तेवढा अर्थ उरलेला नाहीये आणि नुसत्या पदवीत कुणाला फारसं स्वारस्यही उरलेलं नाहीये. इंजिनीअरिंगच्या पदवीनंतर पदव्युत्तर पदवी, पीएच्.डी किंवा एमबीए करण्याचा आणि वैद्यकीय पदवीनंतर स्पेशलायझेशन आणि सुपरस्पेशलायझेशन करण्याचा मुला-मुलींचा कल आहे. त्यांच्या आयुष्यातली, तारुण्यातली महत्त्वाची वर्षे शिक्षणातच खर्ची पडताहेत. परिणामी, वयाच्या तिशी-बत्तिशीपर्यंत विद्यार्थिदशेत असलेल्यांना अचानक गृहस्थाश्रमाची जबाबदारी पेलण्याची कल्पनाही नको वाटते. संसारात गुंतून करीअरवर पाणी सोडण्याचा विचारही नको वाटतो. आतापर्यंत त्यांची संपूर्ण शक्ती आणि ‘फोकस’ अभ्यास, करीअर यावर असल्यामुळे लग्न झाल्यावर संसार करताना, बाह्य जगात वावरायला अंगी वेगळे गुण, वेगळा दृष्टिकोन, वेगळी गुणवत्ता त्यांचा वैचारिक गोंधळ उडू लागतो. काही जणांना, शिक्षण, उत्तम नोकरी वगैरे मिळाल्यावर आत्ता कुठे जरा निवांतपणा मिळतोय्, त्यामुळे एवढ्यात लग्न करून आपल्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण कशाला ओढवून घ्या, असं वाटू लागतं.
पूर्वीच्या पिढ्यांमध्ये स्वयंपाकघरात स्वयंपाक करणार्‍या आईला बघत बघत, प्रसंगी लहानमोठी मदत करून लहानाच्या मोठ्या झालेल्या मुलींना, पुढे लग्नानंतर स्वयंपाक करणं अवघड जात नव्हतं. पण कालौघात नंतरच्या पिढीतही, स्वयंपाकाला बाई, बाहेर जेवणं, जेवण ‘ऑर्डर’ करणं वगैरे वाढू लागलं. आता तर लोक आपल्या घरी आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवतात तरी का, अशी शंका येण्याइतकी परिस्थिती असताना आणि अभ्यासात, अभ्यासेतर व्यापात (को-करिक्युलर ऍक्टिव्हिटिज) गर्क असलेल्या मुलींना ‘एवढा बटाटा चिरून दे किंवा एवढं खोबरं खवून दे’ असं ‘ट्रेनिंग’ मिळणं आपोआपच बंद झालं. त्यामुळे विवाहयोग्य वय असलेल्या मुलीला स्वयंपाक करता येईल, ही अपेक्षा करणंही व्यर्थ ठरू लागलंय्. पण गंमत म्हणजे, विदेशात शिक्षण वा नोकरीनिमित्त गेलेल्या मुलींनाच काय पण मुलांनाही स्वयंपाक करणं, भांडी घासणं वगैरे स्वतःचे स्वतः करावे लागत असल्यामुळे परदेशात गेलेली भारतीय मुले-मुली आपसूक गृहकृत्यदक्ष, गृहकार्यप्रवीण होताहेत! एकूणात, अभ्यासात हुशार असलेल्या आपल्या मुलाला, मुलीला नवरा-बायको म्हणून जबाबदारी पेलायला आपण सक्षम केलंय् की नाही, तसं जीवनाभिमुख शिक्षण आपण त्यांना दिलंय् की नाही, ते जसे आहेत, त्याला आपणही जबाबदार तर नाही ना, हे आई-वडिलांनी पण तपासून पहायची वेळी आलेली आहे.
दर बारा/पंधरा वर्षांनी पिढी बदलते असं समजण्याचा काळ कधीच सरला. आज तीस वर्षांचे असलेले तरुण-तरुणी पंचविशीतल्या तरुण-तरुणींसाठी ‘मागची पिढी’ ठरतील, एवढ्या सपाट्यानं तरुणाईची मानसिकता बदलतेय्. ह्या बदलाला प्रचंड वेग आहे आणि तो वेग भल्याभल्यांची मती गुंग करणारा आहे. वेगवेगळी समाजमाध्यमं, चित्रपट, टीव्ही यांच्या मार्‍यामुळे मुलींचं ‘वयात येण्या’चं वय अलीकडे खूपच सरकलंय् असं अनेक शाळांच्या मुख्याध्यापिकांचं म्हणणं आहे. (अनेक मुख्याध्यापिकांशी झालेल्या माझ्या बातचितीवर आधारित हा विस्तृत लेख पुढे कधीतरी... पण तो समाजाच्या हिताचा विचार करणार्‍यांना नक्कीच अंतर्मुख करेल!) म्हणजे बघा! मुले-मुली खूप लवकर वयात येताहेत, शालेय वयात किंवा उशिरात उशिरा म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यावर तरुण-तरुणींनी प्रेमात पडावं असे संदेश चित्रपट देताहेत, त्याचवेळी विवाहयोग्य वयाचे होऊनही तरुण-तरुणींना एवढ्यात लग्न करायचं नाहीये, त्यामुळे उशिरा लग्न, उशिरा मूल किंवा मूलच नको (डबल इन्कम नो किड्‌स DINK) कारण मूल जन्माला घालायचं तर त्यासाठी करीअरिस्ट स्त्रीला वेळ नाही, अगदी त्या बाळाचं संपूर्ण संगोपन घरचे करायला तयार असले तरीही प्रत्यक्ष मातृत्व त्या स्त्रीलाच नऊ महिने निभवावं लागणार (आता सरोगसीद्वारे तेही करण्याची गरज उरली नाही म्हणा!) असं चित्र आहे. म्हणजे एकीकडे अत्यंत सुसंपन्न, उच्चशिक्षित अशा तरुण-तरुणींच्या मुलांची संख्या आक्रसतेय्, त्याचवेळी आर्थिक विपन्नावस्थेतल्या अशिक्षित लोकांकडून लोकसंख्येत मोठी भर पडतेय्. या विषम परिस्थितीमुळे वीस-पंचवीस वर्षानंतरचं चित्र काय असेल, हा विचारसुद्धा भयावह वाटतो.
मध्यंतरी मी दोन नाटके लिहून, दिग्दर्शित करून दिल्लीत सादर केली. त्यात पंधरा बे्रस्ट कॅन्सरच्या रुग्णांनी काम केलं होतं. थिएटर ऍज थेरपी ही माझी संकल्पना मी त्यांच्यासाठी राबवली आणि ती प्रचंड यशस्वी झाली. दोन्ही नाटकं दृष्ट लागण्याजोगी उत्कृष्ट झाली. तेव्हा भारतात स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतंय्. ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे उशिरा लग्न करणं, उशिरा मूल होणं अथवा मूल न होऊ देणं, बाळाला स्तनपान न करवणं, ही कारणं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. एकूणात वैद्यकीयदृष्ट्या पण उशिरा लग्न करण्यात तोटे अधिक आहेत.
आपली मुलं लग्न करतील कधी, त्यांना पुढे मुलेबाळे होतील कधी, होतील तेव्हा त्यांच्या संगोपनासाठी आपण हातीपायी धड असलो पाहिजे हा विचार आई-वडिलांच्या मनात घोळत असतो. अनेक प्रकारांनी आपल्या मुलांचे चांगले व्हावे, म्हणून ते सुचवत असतात. अशावेळी ते जे सांगताहेत त्यावर एखाद्या प्रोजेक्टप्रमाणे विचार केला, तर त्यांनाही पटेल की सगळं काही वेळच्या वेळी झालेलं बरं!
- रश्मी घटवाई

Friday, July 1, 2016

चहा पोहे आणि बरंच काही



My article was published in tarun Bharat.Here is the Link:
http://epaper.tarunbharat.net/epaper.aspx?lang=3&spage=Akspage&NB=2016-07-01#Akspage_1

लग्न पहावं करून …

लग्न पहावं करून … 
-रश्मी घटवाई 
​​
​​
​​
​​
घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करून अशी आपल्याकडे म्हण असली तरीही त्यातल्या गर्भित आशयाला नं जुमानता मंडळी हिरीरीनं मैदानात उतरतात आणि त्यातही लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं आपण मानत असलो तरी विवाहेच्छुक स्थळांची गाठ पडावी म्हणून आपण मर्त्य मानवांना त्यासाठी प्रयत्न इथे पृथ्वीतलावरच करावे लागतात. कोणे एके काळी मध्यस्थ हे काम मोठ्या आनंदानं करीत. चारचौघांकडे येणे-जाणे असलेल्यांना कुणाची मुलगी उपवर आहे,कुणाचा मुलगा लग्नाचा आहे ,ह्याची माहिती असायची आणि तेही ही माहिती संबंधितांना देण्याचे हे काम समाजकार्य म्हणून मोठ्या आवडीने करायचे.बघता बघता,लग्न जमवणे ह्या हौसेनी करायच्या गोष्टीने व्यवसायाचे रूप कधी धारण केले आणि लग्न नामक कौटुंबिक सोहोळ्याला 
ग्लॅमरस इव्हेंटचे स्वरूप कसे आले ,हा विचार मनात उमटायला सुद्धा वेळ लागावा,एवढ्या प्रचंड गतीनं ह्या साऱ्याचा 'ट्रेण्ड' बदलला .पूर्वी ओळखी-पाळखीतून विवाह ठरायचे,ते जणू आता कालबाह्य झालं.मध्यस्थांची जागा ' 
मॅरेज ब्युरो',वधु-वर सूचक मंडळांनी घेतली. ओळखीच्यांच्या मार्फत कळलेल्या मोजक्या स्थळांऐवजी अपेक्षेत बसणाऱ्या आणि अनुरूप असणाऱ्या  सुयोग्य 
स्थळांची मोठ्ठी यादी केवळ एका क्लिकसरशी पुढ्यात ठेवणाऱ्या संकेत स्थळांवर अधिक भिस्त ठेवल्या जाऊ लागली,वधु-वरांची माहिती प्रकाशित करणारी मासिकं पूर्वीपासून होती,त्यात नवी भर पडली,वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्या शुल्क आकारून 'स्थळांची' माहिती प्रसिद्ध करू लागल्या,त्यांना भरपूर प्रतिसाद लाभू लागला.एवढे सगळे असले;विवाहोत्सुक युवक-युवतींबद्दलच्या माहितीचा ओघ आंतरजालावर कितीही वाहत असला तरीही आजही,आपल्या उपवर मुलींसाठी सुयोग्य मुलेच मिळत नाहीयेत असा मुलींच्या पालकांचा सूर आहे आणि आपल्या मुलाला साजेशा मुलीच मिळत नाहीयेत ही मुलांच्या पालकांची खंत आहे.
 

शिक्षण-नोकरी ह्यानिमित्ताने मुलामुलींची ओळख होऊन प्रेमविवाह होण्याचं प्रमाण वाढलं असलं तरी सगळ्यांचेच काही प्रेमविवाह होत नाहीत. साहजिकच,अगदी पूर्वीसारखे चहा-पोह्याचे जरी नसले,तरी रीतसर बघण्याचे कार्यक्रम होऊन अरेन्ज्ड मॅरेज होण्याचेही प्रमाण खूप आहे. 
मुलगी अथवा मुलगा लग्नायोग्य झाल्यावर ओळखी-पाळखीच्या व्यक्तींच्या कानावर त्यांची माहिती घालणं,त्यांनी स्थळे सुचवणं,हे आता जवळ जवळ कालबाह्य ठरलंय कारण सर्व काही चांगलं  जुळून आलं  तरीही त्याबद्दल कुणी साधे आभार व्यक्त करीत नाहीत पण जर का त्यातून काही वाईट निष्पन्न झालं,तर लोक त्यांच्यावरच ठपका ठेवायला मागेपुढे बघत नाहीत,त्यामुळे लोक स्थळांची माहिती द्यायला कचरतात.एखादी गोष्ट कुणाला आवडेल,तीच दुसऱ्यासाठी नं आवडणारी ठरू शकेल,एखादी व्यक्ती एकाला जशी वाटेल,तशी दुसऱ्याला वाटेलच असे नाही. त्यामुळे ओळखी-पाळखीच्या व्यक्तींकडून माहिती मिळून विवाह ठरणं जवळ जवळ बाद झालंय.त्यामुळे लग्नायोग्य झालेल्या आपल्या मुलाचे अथवा मुलीचे नाव इंटरनेटवर असलेल्या वधु-वर सूचक मंडळात हजारो रुपये देऊन नोंदवणे हा एकमेव पर्याय पालकांपुढे आहे आणि तो काही अंशी सोपा-सुलभ आहे. पण विवाह जमणे म्हणजे केवळ वधु गटाला अपेक्षित असलेल्या गोष्टी वर गटाकडे असणे एवढेच नसते .वधुवर सूचक मंडळाकडे डेटाबेस भलेही खूप मोठा असू शकतो,पण त्या उपलब्ध माहितीस्त्रोतातून लग्न जमेलच याची खात्री कशी देता यावी?परिणामी, "तिथे नाव नोंदवून तीन -तीन महिने उलटून गेलेत,तरी आम्ही आहोत तिथेच आहोत,म्हणजे बघा !"अशी एका पालकांची व्यथा पुरेशी बोलकी ठरते . 

विवाह या विषयावर मी आधीही बरेच लेखन केले आहे.त्या लेखांना वाचकांचा भरपूर प्रतिसाद लाभला होता.आपल्या अवतीभोवती सुरु असलेल्या गोष्टींचा,अनेकांच्या अनुभवांचा इतरांनाही फायदा व्हावा,हा ह्या लेखाचाही उद्देश आहे.सात -आठ वर्षांपूर्वी मी जेव्हा हे लेख लिहिले त्यावेळी कुणीही इंटरनेटवर असलेल्या वधु-वर सूचक मंडळात नाव नोंदवलेल्या वधुवरांची माहिती बघू-वाचू शकत होता.एखादा रिकामटेकडा अथवा आंबट शौकीन  त्या माहितीचा दुरुपयोग करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नव्हती. मी माझ्या लेखांतून त्यावर आवाज उठवला आणि इंटरनेटवर असलेल्या वधु-वर सूचक मंडळांनी त्यानुसार बदल केले.मात्र आजही पालकांची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे अपेक्षेत न बसणाऱ्या,वयाने खूप मोठे अथवा लहान असलेल्या(ही अशी प्रोफाइल्स  मुले स्वत: मॅनेज करीत असतात.)प्रोफाइल्सकडून विवाहाचे प्रस्ताव येतात,ते फोन नंबर घेऊन अकारण संपर्क साधू लागतात.त्यामुळे,कुणीही रिकामटेकडा आपले खोटे प्रोफाईल बनवू शकतो,एखादा आंबट शौकीन काही हजार रुपये भरून आपले खोटे,आकर्षक प्रोफाईल बनवून उपवर मुलींची माहिती मिळवू शकतो,ह्या सगळ्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो,हे ध्यानी घेऊन इंटरनेटवरच्या  
मॅरेज ब्युरो, वधु-वर सूचक मंडळांनी
 आणखी कडक नियम आणि त्यांची काटेकोर अंमल बजावणी केली पाहिजे.

आपल्या अपेक्षेनुरूप असलेल्या,लिखित माहिती आणि फोटोत "यासम हा/ही "भासणारी व्यक्ती प्रत्यक्षात तशी नसते,असाही अनुभव अनेकांना येतो. पालक अनेकदा आपल्या अपत्याचा एखादा गंभीर आजार,सिंड्रोम याबद्दलची माहिती लपवतात,लग्नासाठी अगदी होकार कळवण्याच्या बेतात असतांना ती बाब विरुद्ध पक्षाच्या लक्षात येते आणि त्यांचा अपेक्षाभंग होतो.त्यात दोन्ही पक्षांचा वेळ,पैसा आणि भावना ह्यांची नासाडी होते. 

शिक्षण,नोकरी ह्यानिमित्ताने मुले मुली आपल्या घरांपासून दूर वेगवेगळ्या शहरांत असतात,त्यामुळे मुलगा-मुलगी,दोघांचे आई-वडील अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी एकत्र येउन बघण्याचा कार्यक्रम करायचा किंवा आपापल्या सोयीने भेटी घ्यायच्या,ह्यात हल्ली  भरपूर वेळ लागत असल्याने "चट मंगनी,पट ब्याह "हा केवळ वाक्प्रचार उरला आहे.तसंही लग्न ही काही घिसड-घाईनं करण्याची गोष्ट नाहीये,कारण आयुष्यभराचा प्रश्न आहे!वरवरच्या गोष्टींना भुलून अविवेकानं,अविचारानं घेतलेला निर्णय आयुष्यच बद्लून टाकणारा ठरू शकतो.त्याबद्दल नंतर कितीही पश्चात्ताप केला तरी उपयोग नसतो!आता आजकाल केवळ एकदा भेटून लग्नाचा निर्णय मुलगा-मुलगी घेत नाहीत,किमान दोन-तीन वेळा भेटल्यानंतरच मुलगा-मुलगी आपण एकमेकांना अनुरूप आहोत अथवा नाही हे ठरवतात,मात्र अनेकांना त्यानंतरही निर्णय घेणं कठीण जातं. 

आपण नक्की कसे आहोत, भावी जोडीदारापासून आपल्या काय अपेक्षा आहेत,आपल्या अपेक्षा शंभर टक्के कुणीही पुऱ्या करू शकणार नाही,त्यासाठी काही तडजोडी दोघांनाही कराव्या लागतील ,ह्याची जाण दोघांनाही असली पाहिजे.किंबहुना भावी जोडीदाराशी ज्या गोष्टीत आपण अज्जिबात तडजोड करू शकणार नाही ,आपल्या ज्या तत्वांशी फारकत घेऊ शकणार नाही अशा अजिबात न खपणाऱ्या गोष्टी "रेड झोन "मध्ये ,एकमेकांच्या ज्या गोष्टींकडे आपण कानाडोळा करू शकू,खपवून घेऊ शकू, अशा  गोष्टी "येलो झोन "मध्ये आणि ज्या गोष्टींत,ज्या मुद्द्यांवर संपूर्ण तडजोड शक्य  आहे त्यांना "ग्रीन झोन "मध्ये ठेवावं,अशी विभागणी करून दोघांनीही त्यावर मोकळेपणानं चर्चा केली तर विवाहाबाबत निर्णय घेताना आपण एकमेकांना अनुरूप आहोत अथवा नाहीत ,एकमेकांच्या पत्रिकांमध्ये जुळणाऱ्या गुणांपेक्षाही प्रत्यक्षातले आपले सूर अधिक सुरीले मिळताहेत अथवा नाही,हे ठरवणे सोपे जाईल. 
शेवटी लग्न का करायचं असतं,हे कुणाल चांदेगावकर यांच्या शब्दांत सांगायचं,तर ,

"कुणीतरी असलं पाहिजे…  
कुणीतरी असलं पाहिजे 
संध्याकाळी घरी गेल्यावर 
आपल्यासाठी दार  उघडायला
सकाळी घरातून बाहेर पडताना 
"लवकर ये "असं सांगायला … 
उशीर होत असेल,तर 
"जेवून घ्या "असं सांगायला 
कितीही वेळा सांगितलं तरीही 
आपल्यासाठी जेवायचं थांबायला "

आणि लग्न म्हणजे तरी काय असतं,हे त्यांच्याच शब्दांत सांगायचं,तर ,
"लग्न लग्न म्हणजे तरी काय असतं? 
त्याला लागताच ठसका,तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं 
तिला लागताच ठेच,त्याचं मन कळवळतं ….  
लग्न लग्न म्हणजे तरी काय असतं?
त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरूण असतं 
तिच्या दु:खाला त्याच्या खांद्याचं अंथरूण असतं… "  

My Article was published in Tarun Bharat .Here is the Link:
http://epaper.tarunbharat.net/epaper.aspx?lang=3&spage=Akspage&NB=2016-06-17#Akspage_1